गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, July 22, 2025

 .                            #अर्चना 

                #साठवणीतील_आठवण 


१९८०/८१/८२ या काळात पुण्यातील तेव्हाचे नवोदित, समवयस्क गझलकार इलाही जमादार,अनिल कांबळे,

म.भा.चव्हाण,रमण रणदिवे,प्रदीप निफाडकर,दीपक करंदीकर वगैरे वगैरे मंडळी मी महाराष्ट्रातील एकमेव मराठी गझल गायक असल्यामुळे फार सलोख्याने,

मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.यातील बहुतेकांच्या रचना स्वरबद्ध करून माझ्या कार्यक्रमात गायिलो आहे.सुरेश भट आणि मी,आम्ही विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर,  पुण्यात माझे महाराष्ट्र साहित्य परिषद,फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृग,गांधर्व संगीत विद्यालय असे अनेक कार्यक्रम होत गेले. पुढे १९८४ नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्णी ते पुणे,मुंबई संपर्क हळू हळू कमी झाला. महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच विभागासाठी बरीच गाणी स्वरबद्ध करून दिल्यामुळे 'रिसोर्स पर्सन' म्हणून व बालचित्रवाणी करीता गाणी रेकॉर्ड करायची असल्याने अधून मधूम पुण्यात येणे होत होते.

      २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्यात स्थायिक झालो तेव्हा वरील काही मंडळी 'प्रतिथयश' या पदाला पोहोचली होती.मी अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एक-दोन सोडले तर सर्वजण आपल्या तोऱ्यात असलेले दिसले.म्हणजे खास पुणेरी...तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून दर महिन्याला 'गझलकट्टा' आयोजित करायचो.प्रतिसाद चांगला मिळायचा पण आर्थिक झळ मात्र मलाच बसायची.याच दरम्यान बालचित्रवाणीला असलेले मित्र विकास कशाळकर यांना काही बालगीतं स्वरबद्ध करून हवी होती.(या अगोदर मी आर्णीला असताना कुमाग्रजांचे 'महाराष्ट्रगीत' व विंदा करंडीकरांचे 'उठ उठ सह्याद्रे' ही दोन गीते बालचित्रवाणीकरिता त्यांनी माझ्याकडून स्वरबद्ध करून घेतली होती.) त्यांनी मला विचारले.मी होकार दिला.व मीरा सिरसमकर यांची दोन गीतं नेहा दाऊदखाने (सध्याची नेहा सिन्हा) या बाळ गायिकेकडून गाऊन घेतली.ही गाणी माझ्या वेगळ्या बाजामुळे छान झाली.त्यावरून सिरसमकरांच्या डोक्यात बालगीतांचा अलबम करण्याची कल्पना आली.आणि मग 'खूप मजा करू' हा बालगीतांचा अलबम आकाराला आला.फाउंटन म्युझिक कंपनी तर्फे तो बाजारात आला.पुण्यात आल्यानंतरचे हे माझे पहिले काम होते.

      आर्णीला असताना नागपूरच्या कवयित्री आशा पांडे यांची गीते-भक्तिगीते वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायच्या.त्यांच्या ओघवती लिखाणामुळे परिचय नसतानाही मी अनेक गीते स्वरबद्ध करून संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यायचो.गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी आशा पांडेंची ओळख होती.त्यानेच मला त्यांना भेटायला सांगितले.एकदा आकाशवाणीचे (नागपूर) ध्वनिमुद्रण संपल्यानंतर आशा पांडे यांना भेटलो.गप्पा-गोष्टी-चर्चा झाल्या त्यानंतर विषय संपला.मी पुण्यात स्थायिक झसल्यावर त्यांनी भक्तीगीतांच्या अलबमचे प्रपोजल समोर ठेवले.मी तत्काळ स्वीकारले.आणि कामाला लागलो. अभिषेकी बुवांशी जुनाच संबंध असल्यामुळे व मला थोड्याफार प्रमाणात त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असल्यामुळे ते गुरुसमानच होते.आणि तसेच गाणे शौनकचे होते. म्हणून शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात अलबम करायचे निश्चित केले.हे प्रपोजल घेऊन मी शौनकला भेटलो.यवतमाळच्या एका कार्यक्रमाल बुवांसोबत बालशौनक पण होता.त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी बघत होतो.ती आठवण ताजी झाली.आणि शौनकचा होकार आला. अनुराधाबाई पण तयार झाल्या आणि आमच्या रिहलस सुरू झाल्या अनुराधा बाईंची प्रॅक्टीस त्यांच्याकडे व्हायची. शौनकच्या प्रॅक्टीससाठी कधी मी शौनककडे जायचो तर कधी शौनक माझ्याकडे यायचे.शौनक कडील प्रॅक्टीस विद्याताई आवर्जून ऐकायच्या.आणि प्रॅक्टीस संपली की पहिल्या मजल्यावरील संगीत कक्षातून खाली आलो की चालींवर छान छान प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करायच्या.खरे म्हणजे माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट होती.पण पहिल्या भेटीत परकेपणा जाणवला नाही.या महिना दीड महिन्याच्या कालखंडात त्यांच्याशी अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.त्यांच्या या प्रेममय वागण्यामुळे इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदरीमुळे बुवांकडे गुरुकुल पद्धतीने शिकू न शकल्याची खंत मनात घर करून गेली.नंतर हा अलबम पुण्यातील एलकॉम स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झाला.याचे संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले होते.मिलिंद सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता.त्यानंतर आमची जी नाळ जुळली ती आजतागायत जुळून आहे.या अलबमचे शीर्षक होते 'अर्चना'.याच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कवी  सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा अलबम टी सिरीजतर्फे बाजारात आला होता.वर्ष होते २००६. हा माझा दुसरा अलबम. त्यानंतर संगीतकार म्हणून माझ्या कामाने जो वेग घेतला तो आजतागायत कायम आहे.हे अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वादच समजतो.

No comments:





संगीत आणि साहित्य :