गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, December 15, 2025

माझेच गीत आले ...


     


या गझलच्या बंदिशचा बेस तसा #मधुवंती​ राग आहे.दादरा तालातील ही बंदिश शेवटच्या म्हणजे सहाव्या मात्रेपासून सुरू होते.सुरवातीच्याच 'काही' या शब्दातील 'का' या अक्षरावरील खटका ऐकणाऱ्यास आकर्षित करून घेतो.दुसरा मिसऱ्यातील 'माझेच गीत आले' यातील 'आले' या शब्दाला घेऊन तार रिषभावरून कोमल गांधारपर्यंत उतरतानाच्या सुरावटीत मधुवंतीमध्ये नसलेला कोमल (शुद्ध) 'मध्यम' आल्यामुळे शब्दासोबतच सुरावटही चमत्कृतीपूर्ण झाली आहे,तसेच 'पाळीत रीत आहे' या ओळीतील 'रीत' या शब्दावर कुठे कुठे कोमल मध्यम घेतल्यामुळे 'पटदीप' रागाचा पण भास होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या शेरात कोमल धैवतही अचानक हजेरी लावून गेल्यामुळे शेरांची रंगत वाढली आहे.दुसऱ्या शेरातील #मैफिलीचा​ शब्दावरील  वेगवेळ्या सुरावटी मूळ मधुवंती बाजूलाच ठेवतो.तरी पण पूर्ण बंदिश मधुवंतीच्या आसपास रुंजी घालताना दिसून येते.

【धून तयार झाल्यानंतरच हे विश्लेषण आहे.धून तयार होताना कोणत्या 'धुनकीत' असतो ते मलाही कळत नाही 😊.】

                   गझल

काहीं न बोलण्याची राखून रीत आले

माझ्या समोर आता माझेच गीत आले. 


एकेक घाव माझा आता भरून येई

हे कोण चांदण्याचे टाके भरीत आले


केलास का असा तू बेरंग मैफिलीचा

आता कुठे जराशी मीही लयीत आले


सांगू कशी तुला मी आले कुठून येथे

आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले


ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला

आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले

                         ■

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.


दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

कलंदर


 

Saturday, December 13, 2025

यवतमाळची शकुंतला

 .                        #जगत_मी_आलो_असा                                                           लेखांक ८                   

      शीर्षक वाचून तुम्हाला दुष्यंताची शकुंतला आठवली असेल.ती ही शकुंतला नाही.ही आमची यवतमाळची 'आगीनगाडी' होय.रंभेच्या मुलीचे रक्षण शकुन पक्षाने केले म्हणून दुष्यंताच्या शकुंतलेचे नाव शकुंतला पडले.काही काळ दुष्यंताला  शकुंतलेचा विसर पडला होता ही कथा सुद्धा आपणास माहीत असेलच.अशी ही शकुंतला  पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सुस्वरूप,देखणी कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली वगैरे वगैरे... पण जिला रंग ना रूप अशा यवतमाळच्या 'यवतमाळ ते मूर्तिजापूर' चालणाऱ्या छोट्या (नॅरो गेज) आगीनगाडीला (आगीनगाडी कसली ढक्कलगाडी म्हटले तरी चालेल.) शकुंतला हे सुंदर नाव देणाऱ्या यवतमाळकर रसिकास दाद द्यावी लागेल.ही गाडी इंग्रजांच्या काळात क्लिक निक्सन अँड कंपनीच्या माध्यमातून २५ डिसेंबर १९०३ मध्ये जिल्ह्यातील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती. यवतमाळ रेल्वे स्टेशनचा कोड आहे ytl. येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत.पण विना शेड! (सध्या नवीन रेल्वे स्टेशनचे काम सुरू असल्याचे  कळते.खरे खोटे सरकारला माहीत.)


     तर मित्रहो, ही गोष्ट आहे १९६५ ते १९७० च्या दरम्यानची.बोरी अरब जवळील लाडखेड येथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. लाडखेड हे यवतमाळ मूर्तिजापूर रेल्वे मार्गावर असल्यामुळे सर्व लवाजमा घेऊन 'शकुंतले'ने लाडखेडला गेलो.त्यावेळी शकुंतलेला वाफेचे इंजिन होते.कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी शकुंतलेनेच यवतमाळला निघालो. यवतमाळ जवळच्या लोहारा या गावापर्यंत आल्यावर गाडी आचके देत थांबली.ती सुरूच होईना.चौकशीअंती (ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार) बॉयलर थंड झाल्याचे कळले.बऱ्याच प्रयत्नानंतर अर्ध्या तासाने गाडी धकली, पण थोडे दूर जात नाही तो पुन्हा थांबली.पुनः चौकशी केली असता 'गाडीत बिघाड झाल्यामुळे केव्हा सुरू होईल होईल हे सांगता येत नाही' असे उत्तर आले.गाडी ना धड लोहारा गावत ना धड यवतमाळात.(या परिस्थितीमुळे 'ना घर के ना घाट के' म्हणजे काय ते कळून आले.) लोहारा ते यवतमाळ अंतर तसे तीन साडेतीन किलोमीटर.गाडी चालती असती तर दहा/पंधरा मिनिटात यवतमाळला पोहोचलो असतो.पण एवढ्या अंतरासाठी शकुंतलेने अख्खा एक तास घेऊनही मधेच मुक्काम ठोकला.सायंकाळ होत आली होती.रात्री पुनः यवतामाळातच कार्यक्रम होता.गाडी अशा ठिकाणी थांबली होती की, दुसरे कुठलेही वाहन मिळणे शक्य नव्हते.काय करावे कोणालाच सुचेना.बराच खल झाल्यावर सगळ्यांनी आपापली वाद्ये घेऊन रुळा रुळाने चालत रेल्वे स्टेशन गाठायचे व तेथून टांग्याने गावात आमच्या (ऑर्केस्ट्राच्या) रूमवर जायचे ठरले.गायक मंडळी आपापले गळे घेऊन निघाली.बाकी वादक मंडळी पण आपापले वाद्य घेऊन चालू लागली.या प्रकरणात बासरीवाला मजेत होता.सगळ्यात गोची माझी होती.कारण अकॉर्डियन...! तेही अवजड असे पियानो अकॉर्डियन.तबलेवाल्याने तबल्याची झोळी खांद्यावर घेतली.बॉंगोवाल्याने बॉंगो एका हातात घेतला.

कोंगोवल्याची पंचाईत झाली.त्याने सरळ ते धूड डोक्यावर घेतले.ते पाहून मीही अकॉर्डियनचे धूड डोक्यावर घेतले.व सगळेजण 'हर हर महादेव' म्हणत रस्त्याने (रुळाने) लागलो. यवतमाळच्या चौकीजवळ (सध्याचे दर्डा नगर) आल्यावर आमची 'वरात' पाहून आंबटशौकीन रसिक जमा होऊन गंमत बघायला लागले.आम्हाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.पण इलाज नव्हता. कसे बसे स्टेशवर पोहोचलो व तेथून टांग्याने ऑर्केस्ट्राच्या खोलीवर! आयुष्यात पाहिल्यांदा या गाडीत बसलो.त्यानंतर बॉयलरचा धसका घेऊन पुनः प्रवास करण्याची हिंमत केली नाही.

--------------------------------------------------------------------

दि.१४ डिसेंबर २०२५ दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.



Thursday, December 11, 2025

अशी गावी मराठी गझल

● कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील #प्रख्यात_मराठी_गझल_गायक सुधाकर कदम यांनी. प्रसिद्ध मराठी कवी #कलीम_खान  यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा "#अशी_गावी_मराठी_गझल" 
हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला. इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर कदम आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत. नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.

-डॉ.अजीम नवाज राही-
दै.सकाळ,नागपुर.दिं.११/११/२००९

------------------------------------------------------
         #मराठी_ग़ज़लें_भी_उर्दू_की_तरह_मधुर_होती_हैं
● इंदौर की इस अनोखी गजल निशा के दुसरे आकर्षण थे कलीम खान। सुधाकर कदमजी के संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ठ अंदाज मे कर उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया।

-प्रभाकर पुरंदरे
दै. चौथा संसार,इंदौर
डिसेंबर १९८९
------------------------------------------------------
 ● त्यांना (कलीम खान यांना) गझलेची खरी ओळख झाली ती सुधाकर कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर! कदमांच्या अनेक गझल मैफिलींचे निवेदन कलीम खान करायचे. 

-अमोल शिरसाट
दै.अजिंक्य भारत,गझलयात्रा स्तंभ
३ मार्च २०२१


 

माझी कविता...


 

काही भिकारड्यांना दिलदार मानले मी...


 

माझी मस्ती,माझे जगणे...


 





संगीत आणि साहित्य :