बालपणापासून तर संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गाव सोडून पुण्यात स्थायिक होईपर्यंत माझे आयुष्य अतिशय कष्टमय गेले.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रामधील दगदग, नंतर कोणत्याही सुख-सुविधा नसताना मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार-प्रसारासाठी सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भटकंती.यातून मला १९८२ मध्ये एक रचना स्फुरली.ती म्हणजे #सरगम_तुझ्याचसाठी ! ही माझी पहिली कविता होय.नंतरच्या काही काळात ती स्वरबद्ध झाली.त्यावेळी माझा धाकटा बंधू स्व.प्रशांत कदम ही गझल सदृश्य रचना त्याच्या कार्यक्रमांमधून सादर करायचा.त्याच्या सोबत हर्षवर्धन मानकर,अनिल रेनकुंटलवार वगैरे पोरं तसेच माझे अनेक विद्यार्थी पण ही रचना गायला लागले.सध्या मयूर महाजन हा पुण्यातील गायक "सरगम तुझ्याचसाठी" शिर्षकांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात या रचनेने करतो.माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब होती/आहे.
बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर नुकत्याच झालेल्या वाशीमच्या महाविद्यालयातील कार्यशाळेत ही गझलसदृश्य रचना त्यातील काव्य व त्याला साजेशा सुरावटी कशा घ्याव्या/घ्यायला हव्या याबद्दल सविस्तर माहिती देत प्रा.हर्षवर्धन मानकरने (त्या वेळचा 'हर्षू') अतिशय चांगल्या पद्धतीने ही सादर केली.अर्थात स्वरबद्ध करतानाच ह्या सुरावटी आल्याच होत्या.तरी पण कार्यशाळेतील उपस्थित विद्यार्थी व रसिकांना त्या उलगडून सांगणे महत्वाचे ठरते.त्या बद्दल हर्षूचे मनःपूर्वक अभिनंदन! (तुझ्या गायकीच्या ढंगाने प्रशांतची आठवण ताजी झाली) ऐका तर...
सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी, प्रिये तुझ्याचसाठी
सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी
घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रिये तुझ्याचसाठी
व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रिये तुझ्याचसाठी
('विराणी' ऐवजी 'मारवा' घेण्याची कल्पना प्रशांतची होती)
तबला - प्रा.अनिल सोनोने
हार्मोनियम - प्रा.डॉ.वतारे
की बोर्ड - आदेश बनसोड
Mobile recording by madhukar bansod, washim




No comments:
Post a Comment