मुक्काम पांढरकवडा, २६ डिसेंबर ८१ ची ती रात्र. दहा वाजले. स्थानिक पुरोगामी साहित्य कलासंघ द्वारा आयोजित '#रंग_माझा_वेगळा'... कृषी भवन श्रोत्यांनी गच्च भरलेले. सुरेश भटांचा रंग वेगळा आहे हे इथल्या रसिकांना केवळ वृत्तपत्रे वाचून ठाऊक होते. उत्कटता शिगेला पोचलेली. हारतुरे, परिचयादी उपचार घाईघाईने उरकण्यात आले.
मायभूमीला नतमस्तक होऊन #सुरेश_भटांनी रंग भरण्यास सुरूवात केली.
'जय जन्मभू जय पुण्यभू जय स्वर्गभू सुखदायिनी
जय धर्मभू जय कर्मभू जय वीर भू जय शालिनी।।
काश्मीरच्या छातीतुनी जखमा तुझ्या बघ वाहती
जय कोटी जय गणमानीनी जय सकल मानस मोहिनी।।
ऊंच स्वरः नीरव स्तब्धता, भारतमातेचे ते 'जयगान' भारतामाता तेजस्वी आहे: विजेसारखी प्रखर, ह्या काळोखी विश्वात ही मायभूमी 'सौदामिनी' आहे:
नाही बरे माझा तुझा जनती जिव्हाळा संपला
साध्या सुध्या शब्दात या, तू ओतिली मंदाकिनी।।
लगेच 'वय निघून गेल्या' ची खंत सुरेश भटांनी प्रदर्शित केली-
देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले
गेले ते उडुन रंग उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
रिमझिमतो रातंदिन स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले
हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले
आणि खरेच विसाण्याची गरज दिसू लागली. रंगावर भुलण्याची हात पुढे करण्याची, चेहऱ्यात जगण्याची, नावगाव पुसण्याची मजा काही 'और' असतेः परंतु नियती इथेही भींत बनते कालसीमेच्या रुपाने. म्हणूनच काही वेळासाठी सुप्रसिद्ध गायक #सुधाकर_कदम यांचेकडे व्यासपीठ सुपूर्दः-
'हा ठोकरून गेला, तो ठोकरून गेला
जो भेटला मला तो, वांधा करुन गेला
चाहूल ही तुझी की, ही हुल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी, तोही दुरुन गेला।
वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला
आपल्या मनाच्या वेशीवर आलेले आपलेच सवाल आपल्याच ओठात जेव्हा जिरतात, आपल्यालाच वगळून फुलांची दिंडी जेव्हा निघून जाते तेव्हा माणसे चलबिचल झाल्याशिवाय कसा राहणार? श्रोतृवृंदास चिंतनाच्या गर्तेत सुधाकर कदमाने आपल्या मधुर कंठाने अशाप्रकारे लोटले खरे आणि सुरेश भटांनी 'अजून काही' सांगण्यास सुरूवात केली-
'तुझ्था नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही
तसा न रस्त्यात, आज धोका मला परंतु
घरात येतात वाटमारे, अजून काही।
(वाटमाऱ्यांचा पद्यांश पुन्हा ऐकावासा वाटल्यावरुन श्रोत्यातून 'वन्स मोर'चा आवाज.)
करु नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे, अजून काही
विझून माझी चिता युगे लोटले तरीही
विझायचे राहिले निखारे, अजून काही
सुखाव्या निवांत दारास आपण नको असलो तरीही व्यथांची काही दारे अजूनही सताड उघडी आहेत आणि दिशांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करुनही बंडखोर वारे वाहत असतातच. श्रोत्यांनी मनमुरादपणे दाद दिली.
परत एकदा सुधाकर कदम मुक्तीनाथाची भूमिका बजावतात पण 'भलत्याच वेळी लाजणं बरं नव्हें' चा इशारा देत
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही
एकमेकांचा जीव जाळणे, लाजणाऱ्याने जागणे बरं नव्हे असा सुरेश भटांचा हितोपदेश सुधाकर कदमाच्या सुरेल आवाजाने रसिकांची श्रृंगार मने चाळवून गेली.
हरवलेले सुगंधित क्षण पदरात बांधून व पूर्णिमेची चांदणी वेणीत माळून येण्याची प्रतीक्षा करता करताच आयुष्याच्या संध्याकाळची दुखद चाहूल रसिकांना स्पर्शन गेली.
जितके जगावयाचे, तितके जगून झाले
फिरते उगीच जाते, जगणे दळून झाले
तुमच्या खिशात ठेवा, तुमचे रुमाल कोरे
आत्ताच आसवांनी, डोळे पुसून झाले।
रसिकांच्या मनातील हुरहुर विरते न विरते तोच अध्यात्मिक तार्किक विद्रोहाची विषमतेची जाण उफाळून आली ती अशी-
शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला, गोठ्यातच जगला हेला।
पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही, माणूस कोणता मेला?
जगण्याचे मद्य व जन्माची घूंद हवी असणाऱ्यांनी हृदयाचा फुटका पेला आपल्याच रवताने विसरले पाहिजेल असे सांगून परत सुधाकरांनी माईक घेतला...
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला।
ओठ ओठांना सतावू लागले
श्वास गालाला छळाया लागला।
तोच मी होतो गडे हा तोच मी
जो तुला आता कळाया लागला।
लोकप्रिय व उत्साही माजी नगराध्यक्ष डॉ. धावडे यांच्या 'फरमाईश' वरुन उपरोक्त गझल गाण्यात आली:
चंद्र तसा तो मावळतीचा, आणि आता 'हा असा चंद्र'---
हा असा चंद्र, अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठीं।
काय आगीत कधी आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी।
नेहमीचेचे जुने घाव मोजायचे सोडून उभा जन्म चिरायासाठी सखीला 'ये गडे' म्हणताना टाळ्यांचा कडकडाट झाला. राग, रंग, रस, जीवनानूभती, इत्यादींवर आरुढ होतहोत 'रंग माझा वेगळा'चे प्रथम चरण संपले.
कार्यक्रमाच्या पूर्वाधातील कुणी काव्यांश गुणगुणत, कुणी त्यावर भाष्य करीत करीत या रसिकांनी सभागृहात पुनश्चप्रवेश केला आणि सुरेश भटांनी गझल रूपातील 'पूर्तना' ही कविता गाण्यास सुरूवात केली.
'पूर्तता माझ्या व्यथेची, माझी मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी।
सोबती काही जीवाचे, मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली, चिता माझी जळावी।
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने कार्यक्रमाचा उत्तरार्ध प्रारंभ झाला आणि अत्यंत उंच आवाजात सिंहाच्या आरोळी समान सभागृह दणाणून गेले ते 'भीमवंदना 'ने-
भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना।
कोणते आकाश हे? तू अम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?
या भरार्या आमुच्या, ही पाखरांची वंदना।
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला
कापले गेलो तरी तोडले नाही तुला
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना।
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनस्मृतीच्या वंदनेनंतर सुधाकर कदमांनी आपली गझल पेश केली अश्रूला जन्मभर नानाविध बहाणे सांगितले खरे परंतु फसव्या जिण्याचे दांभिकपण शिकता येऊ नये तर. आणि मग अशी 'रात्र'-
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकुनि डोळे, हरवून रात्र गेली।
अजून सुगंधी येई, खोलीत मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली।
देहभान विसरून रसिक तल्लीन झालेले: साज, रसिकता शिखर गाठतागाठताच साऱ्यांची काळिजे चरचरुन जाणारी दुःखद बातमी श्रोत्यांपर्यंत येऊन थडकली. आणि साऱ्यांचच डोकं सुन्न झाले, अचानक कु. माया बोरेले निघून गेल्याची ती दुष्ट वाता ऐकून:
पायाशी लोळण घेणाऱ्या कांचनाला तिच्या सामाजिक व साहित्यिक मनोकामनेने केव्हाच ठोकरले होतेः माया कवयित्री होती. सुरेश भटांचेही मन हेलावून गेले. काही क्षण डोक्यावर हात ठेऊन स्तब्ध बसले आणि समारोप असा केला-
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही।
हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही।
मी रंग पाहिला या मुदांड मैफिलीचा
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही।
-हरिश्चंद्र भेले याजकडून
दैनिक लोकमत, नागपूर





No comments:
Post a Comment