गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, December 15, 2025

माझेच गीत आले ...


     


या गझलच्या बंदिशचा बेस तसा #मधुवंती​ राग आहे.दादरा तालातील ही बंदिश शेवटच्या म्हणजे सहाव्या मात्रेपासून सुरू होते.सुरवातीच्याच 'काही' या शब्दातील 'का' या अक्षरावरील खटका ऐकणाऱ्यास आकर्षित करून घेतो.दुसरा मिसऱ्यातील 'माझेच गीत आले' यातील 'आले' या शब्दाला घेऊन तार रिषभावरून कोमल गांधारपर्यंत उतरतानाच्या सुरावटीत मधुवंतीमध्ये नसलेला कोमल (शुद्ध) 'मध्यम' आल्यामुळे शब्दासोबतच सुरावटही चमत्कृतीपूर्ण झाली आहे,तसेच 'पाळीत रीत आहे' या ओळीतील 'रीत' या शब्दावर कुठे कुठे कोमल मध्यम घेतल्यामुळे 'पटदीप' रागाचा पण भास होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या शेरात कोमल धैवतही अचानक हजेरी लावून गेल्यामुळे शेरांची रंगत वाढली आहे.दुसऱ्या शेरातील #मैफिलीचा​ शब्दावरील  वेगवेळ्या सुरावटी मूळ मधुवंती बाजूलाच ठेवतो.तरी पण पूर्ण बंदिश मधुवंतीच्या आसपास रुंजी घालताना दिसून येते.

【धून तयार झाल्यानंतरच हे विश्लेषण आहे.धून तयार होताना कोणत्या 'धुनकीत' असतो ते मलाही कळत नाही 😊.】

                   गझल

काहीं न बोलण्याची राखून रीत आले

माझ्या समोर आता माझेच गीत आले. 


एकेक घाव माझा आता भरून येई

हे कोण चांदण्याचे टाके भरीत आले


केलास का असा तू बेरंग मैफिलीचा

आता कुठे जराशी मीही लयीत आले


सांगू कशी तुला मी आले कुठून येथे

आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले


ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला

आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले

                         ■

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.


दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

No comments:





संगीत आणि साहित्य :