गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, February 21, 2024

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २८)

.                            -हुकलेली संधी-

     पन्नास पंचावन वर्षांपूर्वी एच. एम.व्ही.कंपनीची यवतमाळ जिल्ह्याची डीलरशिप दीपक देशपांडेचा मोठा भाऊ अरुण देशपांडे याच्या 'अरुण रेडिओ' कडे होती.एच. एम.व्ही च्या सर्व ध्वनिमुद्रिका अरुण रेडिओ मार्फत जिल्ह्यात वितरित व्हायच्या.दीपक आमच्या ऑर्केस्ट्रात तबला वाजवायचा.त्या कालखंडात सुगम संगीतावर योग्य प्रकारे तबला वाजवणारा यवतमाळातील एकमेव कलाकार म्हणजे दीपक. ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस संपल्यानंतर कधी-मधी रात्री दिपकच्या माध्यमातून नवीन आलेली एखादी रेकॉर्ड ऐकत बसायचो.'शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), ब्रजभूषण काबरा (गिटार) यांची 'कॉल ऑफ दि व्हॅली'  ही 'लॉंग प्ले रेकॉर्ड' आली असता कितीतरी पारायणं अरुणला कळू न देता आम्ही गुपचूप केली. त्याच कालखंडात माझ्या मुंबई वाऱ्या सुरू होत्या.माझा साळा हेमंत चांदेकर (त्यावेळी लग्न व्हायचे होते,प्रेम प्रकरण सुरू होते.) याला त्याच वेळी (अंदाजे १९७०/७१)  कॅनरा बँकेच्या मुंबई शाखेत नौकरी मिळाली होती. एकदा मुंबईला गेलो असता एच. एम.व्ही.च्या कार्यालयात जाऊन आम्ही (मी आणि हेमंत) यवतमाळचे डीलर 'अरुण रेडिओ' कडून आल्याची थाप मारून ध्वनिमुद्रण ऐकायची इच्छा व्यक्त केली.डीलर म्हटल्यानंतर तेथील अधिकाऱ्याने एका कर्मचाऱ्याला वरच्या मजल्यावरील स्टुडिओत घेऊन जाण्यास सांगितले.स्टुडिओमध्ये  प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेल्या एका बंगाली गाण्याचे ध्वनिमुद्रण होणार होते.त्याची प्रॅक्टीस सुरू होती.आम्ही डीलर असल्याचे हेमंतदांना सांगून स्टुडिओत बसायची परवानगी घेतली.गायिका त्यांची मुलगीच होती.त्यावेळी 'ट्रॅक' पद्धत नव्हती.गायक वादक एकत्र प्रॅक्टीस करायचे.प्रॅक्टीस 'ओके' झाली की ध्वनिमुद्रण सुरू व्हायचे. तर थोड्याच वेळात ध्वनिमुद्रणाला सुरवात झाली.वादकांमधील अकॉर्डियन वादकाच्या चुकीमुळे टेक वर टेक होत होते.मी पण यवतमाळच्या ऑर्केस्ट्रात अकॉर्डियन वाजवायचो.त्यामुळे 'त्या' अकॉर्डियन प्लेअरला जमत नसलेल्या पीसचे नोटेशन माझ्या डोक्यात आले व मी ते सहज वाजवू शकलो असतो.'मी वाजवून बघू का' असे विचारायची उत्कट इच्छा झाली होती.पण  रिटेक मुळे त्रस्त झालेल्या हेमांतदांच्या त्रस्त चेहऱ्याकडे पाहून विचारायची हिंमत झाली नाही.त्यांच्या समोर मी बच्चा होतो.शेवटी एकदाचे ध्वनिमुद्रण संपले व आम्ही तेथून निघून आलो.बाहेर आल्यावर  बोलत बोलता  हेमंतला म्हटले, अकॉर्डियनचा 'तो' पीस मी सहज वाजवू शकलो असतो'. त्यावर हेमंत म्हणाला 'तू तिथेच का बोलला नाही.मी तशी विनंती हेमंत कुमार यांना केली असती.अरे,हे जर तू केले असतेस तर कदाचित तुझ्या मुंबईतील कामाची सुरुवात झाली असती.' पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे म्हणा किंवा आपल्याकडून दुसरा कलाकार अपमानित होऊ नये या विचाराने म्हणा माझी एक संधी हुकली.


 

No comments:





संगीत आणि साहित्य :