गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.

Monday, January 4, 2021

दोन आठवणी...शंकर बडे              ●मी कॉलेजमध्ये शिकत असताना मला एक वर्ष ज्युनिअर महेश शिरे नावाचा विद्यार्थी होता.हा १९६७/६८ चा काळ. त्यावेळी एन. सी.सी. आणि एक कँप केला नाही तर विद्यापीठाच्या परीक्षेला बसायची परवानगी नसे.त्यात पुसद तालुक्यातील भोजला येथे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा कँप झाला होता.शेवटच्या दिवशी रात्री झालेल्या कार्यक्रमाचे संचालन मी केले होते.ते ही बिनाका गीतमाला सिलोनवरून सादर करणाऱ्या अमीन सयानी स्टाईलने. माझं संचालन भाव खाऊन गेलं.त्यावेळी शिरे यवतमाळ येथील भाग्योदय कला मंडळाचा जो शिवरंजन ऑर्केस्ट्रा होता त्यात गायक होता.माझं संचालन ऐकल्यामुळे आम्ही परत आल्यावर तो माझ्या मागे लागला की, तुम्ही आमच्या ऑर्केस्ट्रात या.मला भीती होती हे माहीत झाल्यावर बावाजी (वडील) भैरवी सुनावतील याची.शेवटी मलाही राहवलं नाही आणि महेश शिरे सोबत त्यांच्या ऑर्केस्ट्राच्या कार्यालयात गेलो.सुधाकरची आणि माझी पहिली भेट तिथे झाली आणि या ओळखीचं  मैत्रीत कसं रूपांतर झालं हे आमचं आम्हालाही समजलं नाही.
      (कार्यक्रम करताना)  पुढं आमच्या हे ध्यानात आलं की दोन सव्वा दोन तासानंतर आमची (श्रोत्यांवरची) पकड ढिली पडायला लागते.याचे कारण कुठला तरी विनोदी ऍटम मधे मधे घालायला हवा असं आमच्या लक्षात आलं.पण कुठला हे कुणाला सुचेना.मग मी सुधाकरला म्हटले, मी कॉलेजमध्ये कार्यक्रमात अमरावतीचे श्री मनोहर कवीश्वर आणि वर्धेचे वऱ्हाडी कवी प्रा.देविदास सोटे यांच्या कविता म्हणत असतो.त्यावर टाळ्या पडतात.त्या घेऊन पहायच्या का?सुधाकरला ही कल्पना आवडली आणि त्याच्या होकारानंतर पहिला प्रयोग हनुमान आखाडा (यवतमाळ) चौकातील कार्यक्रमात घेऊन  पाहिल्या.लोकांनी टाळ्यांनी पसंती दिली.दोन वर्षे निघून गेल्यावर सुधाकर मला म्हणाला,'ही उसनवारी किती दिवस?आता तू लिहून पहा.' 
मी? 
माझा प्रश्न..
त्यावर सुधाकरचं म्हणणं होतं की,तू चांगली कविता लिहू शकतो याची मला खात्री आहे.तू मनावर घे, बस जमते.खरं तर स्टेजवरची कविता तिथेच पास की नापास हे कळते म्हणून जरा धाकधूक होती.त्या वर्षी पावसाळा पावसासारखा बरसत होता.सात दिवसाची झड लागली,नदीला पूर,नागो बुढ्याचं बुढीसंग झमकनं हे सारं मनात झिरपत गेलं आणि कविता पाच मिनिटात कागदावर उतरली.
'पावसानं इचिन कहरच केला,
नागो बुढा काल वाहुनच गेला.'
सुधाकरचं पेरणं कामी आलं.आणि मी बोलीतील कवितांचं पीक घेत गेलो.ते अजूनही गेली पंचेचाळीस  वर्षे अव्याहत चालू आहे.
             ●सुधाकरच्या अनेक आठवणी असल्या तरी आणखी एक आठवण सांगितल्याशिवाय राहवत नाही.मला वाटते अंदाजे ती १९७९८/८९ ची गोष्ट असावी.मी आणि सुधाकर  माझ्या मोठ्या बहिणीकडे कल्याणला गेलो होतो.दुसऱ्या दिवशी फिरायला म्हणून आम्ही दोघे मुंबईला गेलो.आणि मंत्रालयात पोहोचलो.त्या आधी कधीच व त्यानंतर आजतागायत कधी तेथे जायचा योग आला नाही.किंवा तसे काम पडले नाही.तेव्हाही आम्ही सहज गेलो होतो.आम्ही भटकतांना पाहतो तर काय समोर कविवर्य सुरेश भट ! माझ्या 'इरवा' या कविता संग्रहास त्यांनी प्रस्तावना दिली होती.तेव्हापासून परिचय व नंतर भेटी होत गेल्या.मला ते दिसताच मी जाऊन त्यांना नमस्कार केला.मला अचानक पाहिल्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटले.आणि मला विचारले,
'तुझे काय काम आहे?'
 त्यावर मी म्हटले,'काहीच नाही.'
'म्हणजे तुम्ही मोकळेच आहात!.
म्हटलं 'हो.'
'मग चला माझ्या सोबत'.सुरेश भट.
आम्ही तिघे बाहेर पडल्यावर मी म्हटले , 'बावाजी (आम्ही त्यांना बावाजी म्हणायचो) हा माझा  दोस्त सुधाकर कदम'. 
'बर!चला मग बोलू'.
एक दोन ठिकाणी टॅक्सीने घेऊन गेले.रस्त्याने एखादे चांगले हॉटेल दिसले की,'येथे मछली खूप छान मिळते,आपण सायंकाळी येऊ.'शेवटी (फिरून) आम्ही आमदार निवासात परत आल्यावर ते ज्या आमदाराच्या खोलीत थांबले होते तेथे घेऊन गेले.बसल्यावर मला त्यांनी पंखा लावायला सांगितला. सुधाकर बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला तेव्हा मी सुरेश भटांना म्हटलं,
 'बावाजी हा माझा दोस्त संगीतात छान आहे.' 
त्यावर त्यांनी विचारलं,'टण्ण वाजते का?'
मी म्हटले,'मला तर त्यातला 'सा' पण समजत नाही.तुम्ही त्याच्याशी बोलून तपासून घ्या.'
हा परत आल्यावर  मी बाथरूमला गेलो? आणि सुधाकर सुरेश भटांजवळ बसला.मी फ्रेश होऊन आलो तरी बावजीची व त्याची चर्चा सुरूच होती.
      नंतर माझ्याजवळ बावाजीचा अभिप्राय होता,
'पोट्ट कलदार आहे.' मग यांच्या भेटी वाढत गेल्या आणि कविवर्य सुरेश भट एके दिवशी आर्णी (जिथे सुधाकर शिक्षकाची नोकरी करीत होता) येथे मुक्कामी आले.काही नवीन गझला लिहिल्या गेल्या.काही गझलांना चाली दिल्या गेल्या.पण मला तेव्हा आर्णीला जाता आले नाही.मी फक्त ऐकून होतो.नंतर या दोघांचे एकत्र कार्यक्रम कार्यक्रम कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत झाले.पण प्रत्यक्ष ऐकणे माझ्या नशिबात नव्हते.पण आपण त्यांची ओळख करून दिल्याचे निमित्त झालो त्या भेटीला आलेला बहर सुखावत होता.अशा अनेक आठवणीतील या दोन आठवणी.

पेशवे प्लॉट,
यवतमाळ
२/४/२०१४
 

No comments:

संगीत आणि साहित्य :