गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, December 11, 2020

बाबा-रेणू कदम चव्हाण

.
      मी लेखिका वगैरे नाही.पण काही आठवणी अजूनही कालपरवा घडल्याप्रमाणे डोळ्यापुढे तरळत आहेत,जसजशा आठवतील,तशा सांगायच्या आहेत.
      लाल-तांबूस डोळ्यांचा कोणी एक व्यक्ती माझ्या घरात रोज रात्री यायचा आणि सकाळ झाली की निघून जायचा.तो कोण असेल बरे,मला हा प्रश्न नेहमी पडे. नंतर हळूहळू लक्षात आले की,ते माझे वडील आहेत.
      पूर्वी बाबा फार तापट,रागीट होते.रात्री कार्यक्रम करून उशिरा घरी येणे आणि सकाळी उठून शाळेत रुजू होणे, शाळेतील संगीत कक्षात दिवसभर रियाज,रात्री कार्यक्रम अशी त्यांची दिनचर्या असे.त्यामुळे लहानपणी बाबा आम्हाला कमीच मिळाले.आम्ही आर्णीला एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत रहायचो.नंतर स्वतःचे घर झाले तेव्हा बाबांचा सहवास अधिक प्रमाणात लाभू लागला.तेव्हा बाबा खरेच काय आहे,हे हळूहळू कळायला लागले.
      बाबा हे एक उत्तम संगीतकार तर आहेतच पण त्याचबरोबर एक चांगले शिक्षकसुद्धा आहेत. एखादे गीत व गझल शिकवताना एखाद्या कळीच्या पाकळ्या उमलून त्याचे फुल कसे बनते तसे बाबांचे शिकवणे. जोपर्यंत गळ्यातून निघत नाही तोपर्यंत अजिबात न चिडता सांगत रहायचे.बाबांचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्यांच्या बंदिशी आणि चाली या ऐकायला सोप्या पण गायला अतिशय कठीण.एक किस्सा असाच आठवतो.माझ्या लग्नानंतरची गोष्ट आहे.आम्ही 'तसव्वुर' हा सागर साहेबांच्या उर्दू गझलांचा कार्यक्रम करीत होतो.त्यात 'कहता हूँ मूहब्बत है खुदा सोच समझकर' या भैरवीतील गझलेची रिहर्सल करीत होतो.हार्मोनियमवर भाविक राठोड हा एक उमदा गायक बसला होता. आणि 'कल उम्र का हर लम्हा कहीं सांप न बन जाए' हा शेर चालू होता.तो सारखा सांप च्या जागी अडकायचा. बाबांनी त्याला अस्सल वऱ्हाडीत विचारले,'काहून र बाप्पू का व्हा लागलं? तसा तो म्हणाला ,काही नाही बाबा,साप त सापडला पण शेपूट नाही गवसा लागलं तव्हाचं'.
      बाबांचे व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे करणारे होते.त्यांचे असंख्य मित्र आणि चाहते यांची घरी नेहमी वर्दळ असायची. आर्णीला आमचे घर कधीच रिकामे राहायचे नाही.कोणी ना कोणी सतत घरी असायचे.
     आज त्यांच्या गौरव ग्रंथासाठी लाख लाख शुभेच्छा.आई आणि बाबा,तुम्हा दोघांना उर्वरित आयुष्य निरोगी आणि सुखासमाधानाचे जावो ही मनापासून इच्छा व्यक्त करून थांबते.धन्यवाद.
--------------------------------------------------------------------
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित,
'अक्षरमानव' प्रकाशित सन्मानग्रंथ (१३/११/२०१८)
'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...


 

No comments:





संगीत आणि साहित्य :