गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, September 15, 2019

स्वरांचे चांदणे,चांदण्यांचे स्वर... अनंत दीक्षित.



       यवतमाळ जिल्यातील आर्णी या गावातले सुधाकर कदम हे एक गाणारं झाड आता हळू हळू महाराष्ट्रात पसरू लागलं आहे.सुरेश भटांची गझल मुळातच एक लावण्य असलेली गझल आहे.त्यांच्या गझला जेव्हा सुधाकर कदम सादर करतात तेव्हा चांदण्यात चांदणे साडावे तसा एक आगळा मोहोर सभागृहात पसरत जातो.
कोल्हापूरच्या मिड टाऊन रोटरी क्लबच्या वतीने ही गझल मैफल परवाच शाहू स्मारक भवनात झाली.कदम तसे कोल्हापूरला आता नवे नाहीत.सुरेश भटांबरोबर गेल्या महिन्यातच त्यांनी एक मैफल रंगविली होती.त्यावेळी जे अतृप्त होते त्यांचे "मागचे जुने देणे,टाळणे बरे नाही",या भावनेने रोटरी क्लबने हा कार्यक्रम केला होता.
मराठी गझल गायनाचा एक संपुर्ण कार्यक्रम तसा नवाच आहे.गझलच्या सर्व पायर्‍यांवरील अमृतांची फुले श्रोत्यांपर्यंत पोहचविणे हे एक कसबच असते.त्या दृष्टीने कदम यांची मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे. 
उत्तरेकडे जेव्हा मुशायरे होतात तेव्हा हजारो माणसे गझलच्या स्पंदनाचे माधुर्य लुटतात.त्यांचा अदम्य उत्साह कधी-कधी सकाळीच चंद्र घेऊन येतो.या अर्थानं मराठी माणूसही रसिकतेच्या बाबतीत कमी नाही.मराठी माणूसही कोठेही,कधीही कलदार असाच आहे,त्यामुळे या अनोख्या कार्यक्रमाचे चांगले स्वागत होते.
गायकीतलं फारसं कळत असो वा नसो सुरेश भट यांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे सूर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येते.एकदा ही गझल तुमच्या मनात थुयी थुयी नाचू लागली की तुमच्यात एक लाजवाब पिंगा सुरू होतो.
"मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली
हाय, लाजणार्‍याने जागणे बरे नाही..."
]यासारखी मुलायम गझल हे कदम यांच्या अदाकारीचे वैशिष्ट् घेऊनच येते.किंवा
"लागले वणवे इथे दाही दिशांना
एक माझी आग मी विझवू कशाला..."
या सारखी अनामिक चिंता तुम्हाला गहराईत नेऊन सोडते.
"हेच का स्वातंत्र्य ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले
हेच का ते स्वप्न ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले..."
सुरेश भटांचा प्रश्न कदम यांच्या सुरातून आकार गेऊन येतो.शब्दातून आलेला आकार मुळात भक्कम आहे.त्यावर साजही तेवढाच भक्कम आहे.
गझलतज्ञ किंवा गायकीचे तज्ञ कदम यांच्या कार्यक्रमातील वजा-बाक्या मांडू शकतील.तशा जागाही असतील.परंतू एक नवा सूर आज गझलसाठी येतोय ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे.तरीही अगदी अनोख्या माणसालाही एक कुणकुण लागते.हा कार्यक्रम आणखी आखीव व्हावा.सातत्याने त्यावर मेहनत घेतली आहे,याच्या स्पष्ट खुणा दिसायला हव्यात.साचेबंदपणाचा धोका टाळायला हवा.
या मैफिलीच्या इतर अंगांचा विचार केला नाही तर ते अन्याय्य होईल.सर्वप्रथम तुमच्या मनात घर करते ते ती लतीफ अहमद यांची सारंगी.रिमझिम बरसात होत असताना मोराचं नृत्य जसं रोमांचकारी असतं तसं या मैफलीत लतीफ अहमद यांची सारंगी रोमांचकारी आहे.नक्षत्रांनी जागा पकडाव्यात तसे त्यांचे सूर कानात जातात.
दुसरे आहेत तबला वादक शेखर सरोदे.या माणसाचा जन्मच तबल्यासाठी झालाय असं दिसतं.तबल्यातून एक एक मोहक सौंदर्य बाहेर काढण्याचं कसब आहे.त्यात हिसके आहेत,भोवरे आहेत,लपंडाव आहे आणि बरंच काही.त्यांच्या बोटांची किमया अजब आहे.जागा रिकामी दिसली की तबला आणि सारंगीची या मैफलीतली झूंज अफलातून आनंद देणारी आहे.
दै.सकाळ
कोल्हापुर
१६ ऑगष्ट १९८२



No comments:





संगीत आणि साहित्य :