गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, May 1, 2017

जीवनाची गझल आनंदाने गाणारे कवी सुधाकर कदम

     प्रत्येक वय वाढलेला माणूस अनुभवाने समृद्ध आणि परिपक्व होईलच असे नाही.वय वाढले म्हणजे चिंता वाढली,काळजी वाढली आणि प्रकृतीच्या समस्याही वाढल्या असे बर्‍याच जणांच्या बाबतीत होते.आपण असे केले तर लोकांना काय वाटेल,तसे केले तर समाज काय म्हणेल, ही खरे तर अनावश्यक गोष्ट काही जणांच्या बाबतीत मनात अगदी घट्ट बसते.आणि ज्या वयात खरे तर आयुष्यात मनसोक्त जगायचं असतं त्या वयात काही माणसे चौकटीतलं आयुष्य जगून एक एक दिवस पुढे ढकलत असतात.
काही काही माणसे मात्र याला अपवाद असतात.त्यांना आयुष्याचा प्रत्येक दिवस बोनस असल्यासारखा वाटतो.खरे तर आलेला प्रत्येक क्षण ते उपभोगत असतात...जगत असतात.सकारात्मक उर्जेने आयुष्यातील संकटांवर मात करत असतात.आणि नव-नवीन आव्हाने स्वीकारत असतात.अशाच एका हव्या-हव्याशा वाटणार्‍या व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.ते नाव म्हणजे गझलगंधर्व,कवी सुधाकर कदम.
     कवी सुधाकर कदम यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९४९ रोजी खरांगणा (गोडे),जि.वर्धा (विदर्भ) येथे झाला. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत.ज्यांचा उल्लेख खुद्द सुरेश भट "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन" असा करतात.त्या महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घ्यायलाही आपणासही नक्कीच आवडेल.मराठी गझल गायकी महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात रुजवण्यासाठी व पोहचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा कलावंत म्हणून सुधाकर कदम यांचं नाव आदराने घेतल्या जातं.एक थोर गझल गायक म्हणून त्यांचा सुरेश भट व संगीतकार यशवंत देव यांनी तर गौरव केलेलाच आहे,पण विशेष म्हणजे सुरेश भटांच्या सहव्या स्मृ्तीदिनानिमित्त त्यांना ’सुरेश भट स्मृती पुरस्कार’ प्रदान करताना डॉ.नरेंद्र जाधव आणि ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ’गझलगंधर्व’ या किताबाने गौरविण्यात आले.
     १९८३ साली त्यांचा मराठी गझल गायनाचा महाराष्ट्रातील पहिला ’भरारी’ हा अल्बम प्रसिद्ध झाला.बालगीतांची निकड लक्षात घेऊन त्यांच्या १३ बालगीतांचा ’खूप मजा करू’ हा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे.त्यांच्या अर्चना ह्या भक्तीगीताच्या गुलशनकुमार प्रस्तुत सीडीमध्ये शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे सारख्या मातब्बर गायकांनी गायन केले आहे.त्यांनी संगीत दिलेल्या ’काट्यांची मखमल’ या मराठी गझल अल्बमसाठी स्वरसाज चढवलाय तो सुरेश वाडकर,वैशाली माडे यांनी.गीतकार दिलीप पांढरपट्टे आणि संगीतकार सुधाकर कदम यांचा ’तुझ्याचसाठी मी...’ हा अल्बमही रसिकांची मने जिंकून गेला.
बालभारती वर्ग १ ते ४ कविता ’झुला’चे संगीतही त्यांचेच.कुमार भारती इयत्ता ८ ते १० चा ’झुला’ही त्यांचाच.’सरगम’,वर्तमानपत्रातील विषयांतर सदरातील ’फडे मधुर खावया...’ गाजलेले स्फूट लेखही त्यांचेच.
एक संगीतकार आणि कवी म्हणून त्यांची बहरलेली प्रतिभा त्यांच्या कार्यशैलीची चुणुक दाखविते.समाजातील ढोंगीपणावर नेमके बोट ठेवताना आपल्या ’पांगळे’ ह्या कवितेत ते उद्गारतात...

नाही सोवळे ओवळे
आम्ही संपूर्ण नागोळे

पाठी बांधून फिरतो
अहंपणाचे गाठोळे

देह केला जरी दीप
पेटण्याचेच सोहळे

बाह्यांगाला गवसणी
आत निव्वळ भोंगळे

हिणकस गाळो जाता
होतो नेमके पांगळे

    शेतकर्‍यांचे चाललेले हाल बघूनसर्वसामान्य माणूस अस्वस्थ होत असतो.मग सुधाकर कदम यांच्यासारखा संवेदनशील कवी स्वस्थ कसा बसेल ? ते म्हणतात...

व्यवहारवादी जगाच्या भट्टीत
भाजतो सतत शेतकरी...

पिळते जरी त्या,संसार चरक
तरीही नरक होऊ ना दे...

अनेक पिढ्यांच्या सहनशक्तीने
भोगतो जगणे मृतवत...
होण्यासाठी येथे पुन्हा पस्थापित
कोणते गणीत जुळवावे...?

      स्त्रीचे सौंदर्य हा कवीच्या आवडीचाच विषय.तिची प्रत्येक अदा त्याला पण इतरत्र छोट्या छोट्या गोष्टीत दिसली नसती तरच नवल...

तुझा मादक आवाज
जशी सागराची गाज

तुझ्या केसाचे कुरळ
पाडी मनाला भुरळ

तुझे गुलबासी ओठ
जसा प्राजक्ताचा देठ

तुझी गाभुळली काया
जणू अत्तराचा फाया

    वसंत ऋतूच्या आगमनाने माणूस सुखावतो.हाच वसंत सुधाकर कदमांच्या नजरेच्या कॅमेर्‍या असा बंद होतो...

गारव्यात ऊब घेऊनी अनंत
आलाय वसंत लडिवाळ...

सृजनाचा ऋतू गळती थांबवी
कोवळी पालवी लेवोनिया...

पळस,कांचन,गुलमोहराला
रक्तवर्णी माळा लगडती...

    आपल्या ययाती या कवितेतून प्रियतमेशी हितगूज साधताना कदमांची प्रतिभा अशी खुलून येते.

स्पर्शून एकदा तू केले मला ययाती
या भग्न मंदिराशी का जोडतेस नाती ?

आता अशा घडीला मी काय बा करावे
तेजाळलेस देहा लावून एक ज्योती

माझे न राहिले ते तू मागते कशाला
स्वप्नातल्या असे ह्या बिनपालखी वराती

हा पीळ आतड्याचा कोणासही न कळला
मधुपात्र हे रिकामे हातात फक्त माती

    आपल्या ’निथळ’ या कवितेतून तिच्या सौंदर्याची तारीफ करताना सुधाकर कदमांचे शृंगारिक बोल असे बाहेर पडतात...

थेंबाथेंबाला छळतो तुझा आवेगी निथळ
अन् बेसावध क्षणी मना पडते भुरळ

वळणाच्या वळणाची तुझी कमनीय काया
हुंगताच बेहोषतो मत्त अत्तराचा फाया

उजळूनी अलगद तेजाळत भिडतेस
मारूनिया मज मिठी तूच विरघळतेस

    शेतकर्‍यांची दारूण व्यथा प्रकट करताना त्यांच्यातला कवी हळवा बनला नसता तर नवलच...

मेल्यावरी मला देऊ नका अग्नी
भुकेच्या ज्वाळांनी पोळलो गा...

     आयुष्यातील जगण्याचं सूत्र अधोरेखित करताना त्यांच्यातला कवी आक्रमक होऊन सांगू इच्छितो...

पापाच्या झाडाला
मोहाची डहाळी
पुण्य कैसे भाळी
फळावरी...?

    स्वत:चे न्यूनत्व झाकण्याकरिता दुसऱ्याच्या तत्वज्ञानाचा आधार घेणार्‍यांवर त्यांचा शब्दरूपी आसूड असा चालतो..

झाकण्याकरिता
स्वत:चे न्यूनत्व
दुसर्‍याचे तत्व
सांगू नये...

   माणसाचा स्वत:च्याच मनाशी सतत संघर्ष चालू असतो.आपल्या अंतर्मनाशी सततचा संवाद नक्की कशासाठी असतो ?

रे मना, तुज काय झाले सांग ना !
का असा छळतो स्वतःला सांग ना !

हारण्याची ही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना !

हासुनी हसवायचा घे मंत्र हा
दुःख का कुरवाळतो तू सांग ना !

     सुधाकर कदम यांनी अनेक वाद्य वाजविण्याचे ज्ञान आत्मसात केले आहे.नागपूर आकाशवाणीचेही ते गायक व वादक होते.त्यांना आजवर अनेक पुरस्काल लाभले आहेत.त्यात प्रामुख्याने
’आउट स्टॅंडिंग यंग पर्सन’,
’समाजगौरव’,
’संगीतभूषण’,
’मॅन ऑफ द इयर’,
’कलादूत’,
’कलावंत’,
’शान-ए-ग़ज़ल’,
’महाकवी संतश्री विष्णूदास पुरस्कार’,
’गझल गंगेच्या तटावर’,
’सुरेश भट पुरस्कार’ तसेच
’गझलगंधर्व’ उपाधी...
इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
खरे तर शब्द साहित्य सम्मेलनात आम्ही एकदाच भेटलोय पण फेसबुक व फोनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा या माणसाचे माणूसपण आणि मोठेपण सतत जाणवत राहते.कधी त्यांचा नातू अबीरशी दंगामस्ती करतानाचे फोटो तर कधी समाजातील व्यंगावर नेमके बोट ठेवून केलेली कविता फेसबुकवर झळकत राहते.काही माणसे दुसर्‍याला सतत हवी-हवीशी वाटतात...सुधाकर कदम त्यापैकी एक !

-रमेश धनावडे
रविवार पुरवणी
'कवितेच्या सूरातून'
दै.पुढारी
अलिबाग-रायगड
दि.३० एप्रिल २०१७.


No comments:





संगीत आणि साहित्य :